ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया पक्षाचे ध्येय

देशात भटक्या विमुक्तांसह इतर मागासवर्गीय समाजाचा (ओबीसी) पहिलाच पक्ष म्हणून "ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया" हा राज्य निवडणूक आयोग भारत सरकारकडे नोंदणीकृत करण्यात आला आहे. या पक्षाचे मुख्य लक्ष या देशात भटक्या विमुक्तांसह इतर मागासवर्गीय समाजाची ओबीसी शक्ती निर्माण करणे आणि सर्व ओबीसी व एनटी समाज बांधवांना ओबीसीवादी बनवून त्यांचा सर्वकष विकास करणे हा होय.

ओबीसी शक्ती

देशात त्यांच्या हातात लेखनी होती त्यांनी स्वतःच्या जाती-जमातींना प्रकाशात आणले व त्यांचेच नाव लौकिक केले व इतरांना अंधारात ठेवले. फक्त स्वतःचा खोटा इतिहास खरा म्हणून आमच्यावर बिंबवला गेला व आमच्या शौर्याचा इतिहास एक तर नष्ट केला किंवा आपल्या नावावर खपविला. या वर्चस्ववादी जातींनी जाणून बुजून भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाचा इतिहास लिहिला नाही. कारण इतिहासापासून ओबीसींच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल त्या प्रेरनेतून समाजात जागृती होईल व जागृतीतून लक्ष ध्येय व विचार बनतील. यातून छोट्या छोट्या जाती-जमातींची संघटीत शक्ती निर्माण होऊन ही सर्व ताकद एकवटून समाजाची ओबीसी शक्ती बनेल. या शक्तीतुन हा समाज सत्ताधारी होईल. हे वर्चस्ववाद्यांना नको होते म्हणून आमचा इतिहास लिहिला गेला नाही.

आपल्या समाज बांधवांवर कोणी अन्याय केला, त्याला त्याच्या जातीच्या नावाने हिनवून कमी लेखन्याचा प्रयत्न केला तर ओबीसी एनटी समाज घटकातील दुसर्या घटकाला त्याचे वैषम्य वाटत नाही, चीड़ येत नाही याचे कारण ओबीसी एनटी समाजातील घटक स्वतःला दुसरया घटकांपेक्षा श्रेष्ठ समजतो. त्यामुळे हीच भावना संपूर्ण ओबीसी समाजाच्या अधोगतीला कारण ठरली आहे.

वर्चस्ववादी व्यवस्थेने ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक आपल्या स्वार्थासाठी विविध जाती जमातीत विभागुण टाकले आहे. कुणबी, माळी, धनगर, सुतार, लोहार, गोवारी, भंडारी, रामोशी, आगरी इ. समाज आपल्या सर्वांच्या समस्या एक आहेत असे समजून संघटित होतील तेव्हाच देशात ओबीसी शक्ती निर्माण होईल.

आम्ही ओबीसी एनटी समजाच्या उद्धारासाठी कार्य सुरु केले आहे. विशिष्ट धर्म किंवा पंथवादी कल्पनेचा आमच्या कार्यात कधीही अवलंब केलेला नाही व करणार नाही. भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजातील जातीभेदांचे उच्चाटन व्हावे व आपसातील जाती जमाती पिवळ्या झेंडयाखाली एकत्र येऊन ओबीसी शक्ती निर्माण व्हावी हेच आमचे लक्ष्य आहे.

ओबीसीवादी

हजारोवर्षापासून सत्ता, संपत्ती, सम्मान या पासून वंचित राहिल्याने भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाज मानसिकदृष्ट्या खचला आहे. त्याची महत्वाकांक्षा मेली आहे. एवढेच नव्हे टार त्याला आपले भले कशात आहे हे देखील समजत नाही. त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत कधी जातीवादी, कधी भाषणवादी, कधी धर्मवादी, कधी गांधीवादी, कधी प्रांतवादी बनून तर कधी राष्ट्रवादी बनून मतदान करीत आला आहे. येथेच तो फसला आणि वारंवार पिढ्यांपिढ्या फसतच राहिला आहे. पण आता "ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया" ओबीसी समाज बांधवांना ओबीसीवादी बनविणार आहे. ओबीसीवादी म्हणजे राष्ट्रहित, राज्यहित समाज हिताबरोबर तो आता ओबीसी समाजाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक निवडणुकीत मतदान करणार आहे तसेच इतर समाजाप्रमाणे प्रत्येक गोष्टींचा विचार हा आपल्या समाज हिताच्या दृष्टिकोनातून करणार आहे. या समाजाने मान वर करू नये ही सरंजामवृत्ती या राजकीय पक्षांनी जोपासून ठेवली आहे.

आमचे लोक आमच्या समस्यांचे निवारण सवर्ण राजकीय पुढारयांकडून करून घेऊ इच्छीतात. समस्या आमची परंतु त्याचे समाधान पवार, ठाकरे, गांधी प्रभुतींकडून करू पाहतात. जे समस्या निर्माण करतात ते समस्यांचे निवारण कसे करू शकतील ? आमच्या समस्यांचे समाधान आम्हा स्वतःलाच करावे लागेल. आपल्या धडावर आपलेच डोके असले पाहिजे. स्वाभिमान हाच ओबीसीवादी चळवळीचा कणा आहे. यापूर्वीही आपल्या समाजांवर अन्याय अत्याचार होत होते, आजही होत आहेत पण आज समाजात जागृती येत आहे. गुलमगिरीची जाणीव होत आहे. हे क्रांतीसाठी योग्य वातावरण आहे. जर तुम्ही तुमच्या समाजाचे भविष्य आज ठरविणार नसाल तर स्वर्णाच्या तालावर भविष्यात नाचावे लागेल हे उघडच आहे. म्हणूनच भटक्या विमुक्तांसह ओबीसी बांधवांना ओबीसीवादी बनून पुढे पुढे जात राहिले पाहिजे.