ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया का ?

भारत देशाची १२१ कोटी लोकसंख्या आहे. सरकारी आकडेवारीनुसार ओबीसी, एनटी समाजाची लोकसंख्या या देशात ७५ कोटी आहे. भटक्या-विमुक्तांसह ओबीसी समाजातील पुढारयांमध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे त्याचे परिणाम संपूर्ण ओबीसी समाजाला भोगावे लागत आहेत. उपरोक्त आमचे बोलणे खरेच आहे. सध्याची निराशाजनक स्थिती काही गेल्या पाच - दहा वर्षात आलेली नाही. सर्व क्षेत्रात घसरगुंडी होण्याची प्रक्रिया स्वतंत्र मिळाल्यापासून चालू आहे. ओबीसी समाजातील सर्व क्षेत्रात हळुहळु होणारा र्हास कळणे शक्यच नव्हते. समाजातील बुद्धजीवी वर्गातील मंडळींना सुद्धा राजकारण व एकूण समाजात काय चालले आहे व ओबीसी समाज कोणत्या दिशेने चालला आहे याची जाणीव झाली नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे या बुद्धजीवी वर्गाला एकतर समाजात काय चालले आहे कळलेच नाहीं किंवा ज्यांना याची जाणीव झाली त्यांनी आपल्याला त्याचे काय ? असे म्हणून समाजातील या अनिष्ट घडामोडींकडे डोळेझाक केली. ओबीसी एनटी समाजात सध्याची निराशाजनक स्थिती आहे हे खरेच पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता हा खरा प्रश्न आहे. ओबीसी बांधवांना चिड व्यक्त करून मार्ग सापडणार नाही तर सद्य परिस्थिति निर्माण होण्यास कारण काय याचा प्रथम विचार करून त्यावर तोडगा शोधने आवश्यक आहे.

आमच्या मते समाजात सध्याची परिस्थिती उद्दभवण्यास मुलभुत कारण ओबीसी एनटी समाजातील ८० टक्के जनतेचे अज्ञान, अंधश्रद्धा व अशिक्षितपणा होय. आमच्या देशातील धूर्त राजकारण्यांनी तसेच समाजातील बाहुबली संधिसाधु नेत्यांनी लोकशाही पद्धतीनेच आपल्या स्वार्थासाठी या अज्ञानी जनतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला व आज ही घेत आहेत. कधी कधी असे वाटते कि या राजकारण्यांनी ओबीसी जनतेला अज्ञानात ठेवण्याचे धोरण जाणून बुजून राबविले आहे कि काय ? कारण कोणत्याही राजकीय पक्षाने ओ.बी.सी. च्या शिक्षणास अग्रक्रम दिला नाही याचा परिणाम म्हणजेच स्वतंत्र मिळून ६ दशके उलटली तरी आमची ६० टक्के जनता निरक्षर आहे व ३० टक्के जनतेचे शिक्षण १० ते १२ वी पर्यंतच झालेले आहे. या ओबीसी जनतेला नुसती गोड-गोड आश्वासने देऊन किंवा त्यांच्या धार्मिक भावनांना आवाहन करून आमच्यातील राज्यकर्ते निवडून येऊन गोंधळ घालण्यास सज्ज होतात. जर समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तर मुलभुत उपाय म्हणून ओबीसी समाजात शिक्षणास अग्रक्रम दिलाच पाहिजे तसेच धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागरण केले पहिजे. एकदा का ओबीसी जनता शिक्षित झाली कि आपोआप चांगले काय ? वाईट काय ? खरा पुढारी कोण ? संधी - साधू कोण व खोट बोला पण रेटून बोला ! असा बाहुबली राजकारणी कोण ? याची समजाला जाणीव होईल. हे स्थित्यंतर काही दोन चार वर्षात होणार नाही परंतु त्या दिशेने आत्ताच पावले टाकून समाजाने शिक्षणाला सर्वक्षेष्ठ अग्रक्रम दिला आणि धार्मिक अंधश्रध्येच्या विरोधात जनजागृती केली तर पुढील दहा-वीस वर्षात बदल होऊन पुढील पिढ्यांचे जीवन स्वावलंबी व सुसह्य होईल. दुर्दैवाने शिक्षणाची अशीच हेलसांड सुरु राहिली तर कितीही आर्थिक सुधारणा झाल्या तरी भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाज सध्या प्रमाणेच जगातील एक मागासलेला समाज म्हणून ओळखला जाईल.

ओबीसी समाज शौर्यशाली इमानी प्रमाणिक असून सुद्धा आपल्या मागण्यांवर आग्रह व  संघर्ष का करीत नाही ? आम्हाला अभ्यासातून असे लक्षात आले कि ओबीसी पुढारयांमध्ये अनेक दोष आहेत हे अमान्य करून चालणार नाही. परंतु संपूर्ण ओबीसी समाजाच्या माथी त्याचे खापर फोड़ने योग्य नाही. ओबीसी समाजाच्या सध्या एका विलक्षण संक्रमण काळातून प्रवास सुरु आहे. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक प्रकारची असुरक्षितता, अस्थिरता आणि अनिश्चितता जाणवत आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्येच्या मुळाशी स्वार्थ, आत्मकेंद्रीपणा, अविवेक इत्यादी विकारांचा दुर्धर प्रादुर्भाव ओबीसी जनतेत झाल्यासारखा भासत आहे. ओबीसी स्थिर आहे कि गतीशील आहे ? प्रवाही कि साचलेल्या पाण्याप्रमाणे आहे ? परिवर्तनशील आहे कि जुन्या अंधश्रध्येला चिटकुन आहे ? या प्रश्नांचा विचार ओबीसी जनतेने करायला पाहिजे. आमच्या मते कार्लमार्क्स काय म्हणतो ते विचार करण्यासारखे आहे.  कार्लमार्क्सचे मत असे कि, निष्क्रियतेमुळेच एखादा प्राचीन समाज सडत आहे आणि रसातळात जात आहे. ओबीसी समाजाची सध्या पीछेहाट चालू आहे असे चित्र दिसत आहे. कारण नव्या अनुभवांना थेट भिडण्याची कुवत असलेले आणि चाकोरी तोडून ओबीसी समाजावर होणारया अन्यायाचा मुकाबला करण्याची क्षमता असलेले युवक फारसे आढळत नाहीत तसेच परंपरेचा मागोवा घेत परिवर्तनाचा ध्यास घेणारे कोणी दिसत नाही.

भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाला गुलमगिरीच्या दास्यातून सुटण्यासाठी व ओबीसी समाजाचे स्वतंत्र अस्तित्व पिवळ्या झेंडयाखाली कायमस्वरुपी टिकविण्यासाठी आमच्या मते एकच मार्ग आहे तो म्हणजे या देशात ओबीसी समाज बांधवांचा एक राजकीय पक्ष स्थापन करणे हा होय. म्हणूनच आम्ही भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाचा पिवळ्या झेंडयाखाली पहिलाच राजकीय पक्ष "ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया" या नावाने पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा प्रसार करताना आम्ही घोषणा करतो कि, भारतमाता ही आमची आई आहे. आम्ही तिचे पुत्र आहोत, तिचे व भारतीय राज्यघटनेचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे. ओबीसी समाजाचे पिवळ्या झेंडयाखाली स्वतंत्र अस्तित्व जपणे व जगाला दाखविणे हीच आमच्या पक्षाची मुख्य धारा आहे. भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजातील सर्व जाती - पोटजाती मिळून एक ओबीसी समाज निर्माण झाला आहे. जसे गंगा या पवित्र नदीला अनेक नद्या येऊन मिळतात पण पुढे वाहते ती फक्त एक गंगाच तसेच ओबीसी एनटी समाजाच्या सर्व जाती, पोट जातींच्या प्रवाहांना सामावून घेऊन त्यांना आपलेसे बनुन राहिली आहे ती आमची ओबीसी सस्कृति व तोच ओबीसी समाज.

ओबीसी एनटी समाजाचा पिवळा झेंडा जरी आज आम्ही आमच्या खांद्यावर घेतला असला तरी "ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया" त्याची कधीच मक्तेदारी सांगणार नहीं कारण या देशात जो जो ओबीसी त्याचा या पिवळ्या झेंडयावर अधिकार आहे. तोच त्याचा मानबिंदु आहे, त्याचा त्राता आहे, त्याचा आधार आहे, तोच त्याचा भविष्यातील प्रकाश आहे. म्हणूनच या देशातील सारया ओबीसी समाज बांधवांनी अनेक वर्षाच्या अंधारातून बाहेर पडून या पिवळ्या झेंडयाच्या प्रकाशात यावे. ओबीसी समाजाचे अधिष्ठान असलेला पिवळा झेंडा जोपर्यंत नभोमंडळात चंद्र, सूर्य व तारे ग्रह आहेत तो पर्यंत जगाच्या पाठीवर मजबूतीने फडकत राहिल कारण हा पिवळा झेंडा म्हणजे शोभेची वस्तु नसून आमच्या ओबीसी पूर्वजांना आम्हाला दिलेला शक्तिशाली शुभआशिर्वाद आहे. पिवळा झेंडा म्हणजे आमच्या शौर्याचे व त्यागाचे प्रतिक आहे. सत्तेच्या मागे लागलेल्या आमच्या स्वयंघोषित नेत्यांना हा झेंडा पेलवला नाही. म्हणून आही हा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला आहे. त्याग व पराक्रमाचे प्रतिक असलेल्या या पिवळ्या झेंडयाला थांबायला वेळ नाही तो आता एका जागी थांबणार नाही. "ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया" चे सैनिक पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिणे पर्यंत जाणार. ओबीसी समाजाचे प्रतिक असलेला हा झेंडा लाल किल्यावर मानाने फडकवल्या शिवाय राहणार नाही. हया झेंडयाखाली महात्मा तात्याराव ज्योतिबा फुले यांचे अपुरे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार यात तीळमात्र शंका नाही. "जय ओबीसी" हे घोषवाक्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील तमाम ओबीसी समाजाचा चैतन्य मंत्र बनला आहे.

सध्या कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र ओबीसी समाज खडबडून जागा आहे. या देशाच्या एकतेच्या अखंडतेच्या आणि ओबीसी समाजाच्या उत्कर्षासाठी हा समाज एकवटत आहे. देशातील विस्कळीत झालेला हा उदासीन ओबीसी समाज छत्र शोधीत होता. ओबीसी एनटी पार्टी ऑफ़ इंडिया या पक्षाने हे छत्र दिले आहे. म्हणून कोट्यवधी ओबीसी समाज आज एनटी पार्टीच्या पिवळ्या झेंडयाखाली एकवटत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असला तरी या प्रक्रियेला सर्वांच्या प्रयत्नाने गती प्राप्त झाली आहे. भविष्यकाळात लवकरच जगाच्या नकाशात आणि इतिहासात ओबीसी समाजाचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले जाईल यात शंका नाही. या भारतभुमीतील भटक्या विमुक्तांसह ओबीसी समाजाने एकवटावे ही नियतीचीच इच्छा आहे. ही ऐतिहासिक प्रक्रिया आमच्या हातून घडावी ही श्रींची इच्छा.

भूतकाळ परत येत नाही, पण येणारा भविष्यकाळ मात्र आपला आहे. तो जिंकायचा कि हरायचा हे मात्र आपल्या हाती आहे. तेव्हा आपली पूर्ण शक्ती उपयोगात आणण्यासाठी आपण सगळे एक होउ या ! कल्पक आणि संघटीत प्रयत्नांची जोड देत वेळ पडल्यास संघर्ष करून आपले उद्दिष्ट सध्य करुया. भूतकाळातील मर्यादांच्यावर उठून आपल्यातील अंतर्भूत शक्तीचा उपयोग करून अवघ्या देशास व समजास जागृत करून बलशाली करुया.
धन्यवाद.
जय ओबीसी ! जय महाराष्ट्र ! जय भारत !